न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- पुणे आणि पिंपरी – चिंचवड या महापालिकांमधील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, महापालिकांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासह लॉकडाऊन अंतिम टप्प्यात काही प्रमाणात शिथिलता दिली असली, तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे.
शहरात पीएमपीकडून केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठीच बससेवा सुरू आहे. पालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्याने प्रशासनाकडून कर्मचारी वर्ग करण्याची मागणी केली होती. दोन्ही महापालिकेचे कार्यालयीन कामकाज, रुग्णवाहिका, अत्यावश्यक वाहनांच्या चालक आदी पदांसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. आतापर्यंत पुणे महापालिकेकडे ३५० आणि पिंपरी – चिंचवड पालिकेकडे ३२५ कर्मचारी वर्ग केले आहेत.
चालक, वाहक, मॅकनिक, क्लिनर, हेल्पर, सफाई कर्मचारी आदींचा समावेश आहे. कामामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नये, अशा सूचना चालकांना दिल्या आहेत. करोनानंतर हे कर्मचारी पुन्हा पीएमपीएमएलकडे वर्ग होणार आहेत.