न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हें.) :- माही जैन या अपहृत मुलीच्या सुटकेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी खडेबोल सुनावले. शहरात अपहरण, घरफोड्या अशा गंभीर घटना घडत असताना देखील सोसायटी व दुकानदार परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवत नाहीत, नागरिकांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काळजी घेताना हलगर्जीपणा करायला नको.
नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करणे गरजेचे आहे. वाकड पोलिसांनी केलेल्या पाहणीमध्ये अनेक सुरक्षा रक्षक झोपलेले निदर्शनास आले. त्यानंतरही अनेक सोसायटींनी यावर कोणतीही उपाय योजना केली नाही. दुकानांमध्ये व सोसायटींमध्ये सीसीटिव्ही बसवलेले नसतात किंवा ते नादुरुस्त असतात. याचाच फायदा गुन्हेगार घेत आहेत.
सुरक्षा रक्षक केवळ गेट उघडण्यासाठी नसतात तर ते सुरक्षेसाठी असतात. याची जाणीव सोसायटीच्या नागरिकांना झाली पाहिजे. तसेच मुलांना शाळेतील बसमधून घरी सोडत असताना मुले कोपऱ्यावर किंवा रस्त्यावर न सोडता ती संबंधीत सोसायटीच्या गेटवरच सुरक्षा रक्षका समक्ष सोडण्यात यावीत, असा नियम करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
















