न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- राज्यातील बलुतेदार हा कोरोना व चक्रीवादळामुळे अडचणीत आला असून, तो आता आत्महत्या करू लागला आहे. या परिस्थितीत शासनाने दुकाने चालू करीत, १५००० रु. ची मदत केली पाहीजे, असे आवाहन बलुतेदार संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांनी केले.
बारा बलुतेदार समाज विकास संघाच्या पिंपरी चिंचवड शहर शाखेच्यावतीने बलुतेदारांना न्याय द्यावा यासह अनेक मागण्यांसाठी बलुतेदार गोरगरीब कारागीरांना अन्नधान्य किटचे वाटप करून विविध मागण्यांचे फलक हाती धरीत काळ्या फिती बांधून लक्षवेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी तेली समाजाचे राजु कानडे यांना अन्नधान्य किटचे वाटप वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष हेमंत श्रीखंडे,प्र.निरिक्षक प्रदीप वाळुंजकर,प म समन्वयक गणेश वाळुंजकर, राजू वाळुंजकर,अमीर शेख, योगेश बहीरट, चेतन वेळीस, महादेव वाळुंजकर आदी उपस्थित होते
याप्रसंगी राजेंद्र गायकवाड म्हणाले की, नाभिक, परीट समाजाची दुकाने बंद ठेऊन शासन अन्याय करीत असून बलुतेदारांना कोणतीच मदत करीत नाहीत ही बाब खेदजनक असून त्यासाठी प्रसंगी मोठे आंदोलन समाजांना छेडावे लागेल त्यावेळी आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढू असे ते म्हणाले.प्रदीप वाळुंजकर म्हणाले की बलुतेदारांचे लाईटबील माफ व्हावे.शहराध्यक्ष हेमंत श्रीखंडे यांनी पिंपरी चिंचवड मधील दुकाने शासनाने सुरु करण्याचे आवाहन केले.गणेश वाळुंजकर यांनी आंदोलन तीव्र करण्यासाठी शासनाने आम्हाला भाग पाडू नये ते म्हणाले.
रामदास सूर्यवंशी पुढे म्हणाले की, शासनाने दुकान व घराचे भाडे माफ करावे, बलुतेदार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, शालेय फी सप्टेंबरपासून आकारण्यात यावी.तसेच पिं चि मनपाने ८०००रुची मदत व अन्नधान्याचे वाटप करावे आदी मागण्या करताना केंद्र व राज्य सरकारने सयुंक्तपणे बलुतेदार हिताचे धोरण आखून अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.


















