न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १९ नोव्हें) :- पिंपरी चिंचवड, चाकण, खेड परिसरातील फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्यावतीने लेना उद्योजकांच्या समस्यांसंदर्भात, फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याशी भोसरी एम. आय. डी. सी. येथील भोर रबर प्रॉडक्ट या कंपनीच्या दालनात चर्चा केली. यावेळी चाकण, चिंबळी व भोसरी एम.आय.डी.सी परिसरातील उद्योजक, फोरम ऑफ स्मॉल स्केल असोसिएशनचे पदाधिकारी, मा. नगरसेविका सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट व आदी उपस्थित होते.
फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी शहर व जिल्हयातील उद्योजकांच्या अनेक अडचणी व समस्या खासदारांसमोर मांडल्या. आंबेगाव तालुक्यात मिलेनियम बिझनेस पार्क करण्यात येणार आहे, त्यासाठी खासदारांनी संपूर्ण सहकार्य करावे, भोसरी एमआयडीसी परिसरातील उद्योजकांसाठी एक कायमस्वरूपी उद्योग मित्र कार्यालय उभारावे, जेणेकरून एकाच ठिकाणी शासकीय परवानग्या, भांडवल व जागा व आदी प्रश्न सुटण्यास मदत होईल, चाकण येथील ट्रॅफिक समस्या, काही जागेच्या NA तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात पर्यावरण उद्योगात उद्योजकांसाठी इतर सुविधा देण्याची मागणीही यावेळी भोर यांनी खासदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील म्हणाले की, उद्योजकांना पूर्ण सहकार्य करण्यात येईल, मोशी व चाकण येथे ओव्हरब्रिज होणार असून, लवकरच या कामाकरीता मोशी आणि चाकण येथे टेंडर काढण्यात येतील. फास्ट ट्रेनचा प्रकल्प हासुद्धा लवकरच राबविण्यात येणार आहे. खेड आणि नारायणगाव घाटातील काम पूर्ण करण्याकरीता ६४ कोटीचा निधी, नारायणगावासाठी ४० कोटी निधी वापरण्यात येईल व दोन महिन्यांमध्ये ही कामे पूर्णत्वास येतील. खेडपासून २५ किलोमीटर बायपासचे काम झालेले असून, १३ किलोमीटरचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. मेट्रो, रेल्वे नाशिक फाटा ते आंबेठाण गावापर्यंत नेण्यात येईल, उद्योजकांसाठी अनेक योजना व प्रकल्पाची कामे सुचविल्यानुसार केली जातील व उद्योग मंत्र्यांबरोबर लवकरच बैठक आयोजित करून, सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे खासदार आढळराव पाटील यांनी उद्योजकांना सांगितले.
















