कोरोना नियंत्रणासाठी सक्षम प्रशासक नेमण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णाचे प्रमाण आयुक्तांच्या नियंत्रणाबाहेर गेले आहे. वायसीएम, भोसरी, जिजामाता आणि मनपाच्या अन्य रुग्णालयांकडे पुरेसा स्टाफ नाही. निवासी डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, मावशी यांची त्वरित नेमणूक करावयास हवी. वार्डात एक डॉक्टर ६० पेशंटना तपासात आहे. मनपाच्या काही परिचारिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे मनुष्यबळाच्या कमतरतेत आणखी भर पडली आहे. मार्च महिन्यात ७५० बेडच्या या रुग्णालयास समर्पित कोवीड रुग्णालय झाल्यामुळे पुरेसा कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचारी देण्यात यावेत, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर समितीच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या मागणीची गंभीर दखल घेतली नाही.
जिजामाता, भोसरी रुग्णालयाच्या भव्य इमारती आहेत. तेथे आयसीयू आहेत. तद्न्य डॉक्टर नसल्यामुळे कोव्हिड रुग्णावर तेथे पुरेसे उपचार होत नाहीत. त्या ठिकाणी खाजगी हॉस्पिटलमधील तद्न्य डॉक्टरांना तेथे कोव्हिड समर्पित सेवेत घ्यावे. मनपा तिजोरीतून रुबी हेल्थ केअर सेंटरला त्यांच्या सर्वांच्या पगारापोटी व इतर देखभालीसाठी दरमहा ५० लाख देण्याचा करार केलेला आहे, असे समजते. तेथे मनपाने गेल्या तीन महिन्यांपासून ३० पैकी फक्त २० बेड घेतलेले आहे, असे कळते. तेथे कोरोना पॉझीटीव्ह रुग्णावर उपचार होत नाहीत. रुबी हेल्थ केअरची संपूर्ण सेवा कोव्हिड समर्पित करावी. मनपाच्या ५०/५५ इमारती शहरात धूळ खात पडलेल्या आहेत. अनेक खाजगी हॉस्पिटल्स, पिंपरी पिंपरी-चिंचवड येथील डी वाय पाटील मेडिकल कॉलेज आणि तळेगाव येथील मायमर मेडिकल कॉलेज, सर्व खाजगी सरकारी शाळा, महाविद्यालये जी बंद आहेत, त्यांचे कोरोना उपचार आणि आयसोलेशन वार्डात रूपांतर करावे.
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांना महात्मा फुले जीवनदायी योजना लागू करावी. महामारी नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत खाजगी रुग्णालयाचा स्टाफ आणि व्यवस्थापन ताब्यात घ्यावा. नॉन रेडझोनमध्ये नियम कडक करावेत. वाढत्या रुग्णसंख्येला नियंत्रित करण्यासाठी कृतिशील आराखडा मनपाकडे नाही. आयुक्त आणि त्यांच्या टीमला गांभीर्य राहिलेले नाही. कोरोना संसर्गजन्य रोग आहे. पॉझीटीव्ह रुग्णांना घरात कसे ठेवणार. या शहरातील लक्षावधी जनता झोपडपट्टी, चाळी, वनरुम कीचन मध्ये राहते. संसर्ग झालेली व्यक्ती होम आयसोलेशन कशी होऊ शकेल? मेडिकल सायन्सचे ज्ञान असणाऱ्या लोकांना हा खुळेपणा लक्षात येईल. आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत की, पिंपरी चिंचवड मनपामध्ये अपयशी ठरलेल्या आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना कोरोना नियंत्रण जबादरीतून मुक्त करावे.
औद्योगिक शहर कोरोनापासून वाचवायचे असेल तर स्वतंत्र कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करून त्यासाठी सक्षम आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करून सर्व नियंत्रण त्या अधिकाऱ्याकडे द्यावे. रोजचा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचेकडे पाठवावा. ज्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन आहे, ते सहाय्यक आयुक्त संतोष पाटील नेमके काय करत आहेत. श्रावण हर्डीकर आणि त्यांची टीम डिजिटल आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. सरकारने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर समितीचे गणेश दराडे, सचिन देसाई, क्रांतीकुमार कडुलकर, अपर्णा दराडे, सतीश नायर, बाळासाहेब घस्ते, संजय ओहोळ, ख्वाजा जमखाने यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.












