न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीत दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज साधारण तीनशेच्या वरती करोना रुण आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व महापौर माई ढोरे यांनी शहरवासीयांना प्रत्येक गुरुवार आणि रविवारी स्वयंस्फूर्तीने बंद पाळावा, असे आवाहन केले होते. त्याला नागरिक, व्यावसायिक यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तर, शहरातील काही उपनगरात नागरिक रस्त्यावर येताना दिसले. त्यामुळे गुरुवारी देखील या कर्फ्युला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसले.
महापालिका हद्दीतील दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव परिसरात गुरुवारी जनता कर्फ्युला नागरिकांनी व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये. करोनाची साखळी तोडता यावी म्हणून बंद पाळणे गरजेचे आहे. तसेच सोशल डिस्टन्स पाळत तोंडाला मास्क लावून हात वारंवार साफ करणे गरजेचे आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त व महापौर यांच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.
पिंपळे गुरव, सांगवी, दापोडी, दिघी परिसरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवल्याने दररोज गजबजलेली रस्ते मात्र ओस पडले होते. बंदमुळे रस्त्यावर रहदारी कमी प्रमाणात होती. केवळ अत्यावश्यक सेवेत असलेले मेडिकल, दवाखाने सुरू होते.


















