न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै. २०२०) :- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोमवारी (१३ जुलै) मध्यरात्रीपासून १० दिवसांसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले आहेत. महापौरांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही लॉकडाऊनची गरज व्यक्त केली होती. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला.
सोमवारपासून म्हणजे १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढचे १० दिवस म्हणजेच २३ जुलैपर्यंत लॉकडाउन असणार आहे. हा लॉकडाऊन दोन टप्प्यात असेल. पहिला टप्पा हा १३ जुलै ते १७ जुलैपर्यंतचा असणार आहे. या कालावधीत लॉकडाऊन अत्यंत कडक असणार आहे. या टप्यात शहरात केवळ दुधाची आणि औषधांची दुकानं सुरु राहणार आहेत.
तर दुसरा टप्पा १८ ते २३ जुलैपर्यंत असेल. दुसऱ्या टप्प्यात शहरात सकाळी दहा ते चार या कालावधीत अत्यावश्यक सेवेसह जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, किराणा माल, भाजीपाला यांची दुकानं खुली असतील. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी शनिवारी, रविवारी व सोमवारपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून ठेवावी.


















