- कोरोनामुळे मृत रुग्णाच्या मृतदेहासंबंधीच्या कामकाजासाठी २७ लाखांचा खर्च…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच पहिली ऑनलाईन सभा आज पार पडली. त्यामध्ये कोव्हीड १९ करीता महानगरपालिका हद्दीतील सुमारे १० हजार नागरीकांची सीबीसी, ईसीजी, विडाल, सीआरपी, तापमान इत्यादी तपासणीकरीता येणा-या र.रु.४० लाख खर्चासह इतर विविध विकासकामांसाठी येणा-या सुमारे २१९ कोटी रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली. स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संतोष अण्णा लोंढे होते.
मार्च २०२० मध्ये लॉकडाउन झाले होते व संचार बंदी लागू करण्यात आलेली होती त्यामुळे वर्ष २०१९- २०२० मधील र.रु.८ कोटी ८८ लाख रुपयांची बिले प्रलंबित होती ती अदा करणेस बैठकीत मान्यता देण्यात आली. अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी वोल्व्ह ऑपरेशन व्यवस्थापन करणेकामी येणा-या ६६ लाख ३० हजार रकमेच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
तालेरा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून नविन इमारतीचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. यासाठी जादा विद्युतभार घेण्यासाठी येणा-या ३० लाख १७ हजार रकमेच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ९ येथील नेत्र रुग्णालय इमारत व इतर इमारतीसाठी फर्निचर व्यवस्था करणे व अनुषंगिक कामे करण्यासाठी येणा-या र.रु. ३९ लाख २८ हजार रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली. कोरोना बाधित रुग्ण उपचारादरम्यान मरण पावल्यास त्यासाठी योग्य ती खबरदारी घेवून मृतदेहासंबंधी कामकाज करण्यासाठी १६ स्वतंत्र कर्मचारी ६ महिने कालावधीसाठी किमान वेतन दराने
पुरवणेकामी येणा-या २६ लाख ९० हजार रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी शहरात विविध ठिकाणी गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत असून त्याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अशा सुचना प्रशासनास केल्या. तसेच क्वारंटाईन सेंटरमध्ये चांगल्या प्रतीचे जेवण देण्यात यावे अशा देखील सुचना केल्या.


















