न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हें.) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक होण्यासाठी नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची नियुक्ती सहसचिव नियोजन विभाग, मंत्रालय मुंबई, येथे न करता, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून करण्याची मागणी, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे.
यात त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सन २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात आपण भय, भ्रष्टाचारमुक्त महानगरपालिका व पारदर्शक कारभाराची हमी दिली होती. मात्र, मागील दोन वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार, सल्लागार, नगरसेवक यांनी संगनमत करून करदात्या नागरिकांच्या तिजोरीवर दिवसा ढवळ्या दरोडे घालण्याचे काम केले असल्याचा आरोप, भापकर यांनी केला आहे.
३१ मार्चनंतर आलेल्या ठेकेदारांची बिले आडवून स्थायी समितीने त्यांच्याकडून कोट्यावधींची टक्केवारी वसूल करून, महानगरपालिकेच्या कारभाराचा श्रीगणेशा केला. निगडी येथील भक्ती शक्ती शिल्प उड्डाणपूल, ग्रेडसेप्रेटर व अनुशंगीत कामे कामे रक्कम रुपये ९० कोटीच्या कामात गैरव्यवहार झाला आहे. र. रु. ४२५ कोटी रकमेचे रस्ते विकासाच्या कामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला आहे. रु ५०० कोटीच्या कचरा निवेदत कोट्यवधीचा गैरव्यवहार झाला. रु ४५० कोटी रकमेचे पंतप्रधान आवास योजनेत कोट्यावधीचा गैरव्यवहार झाला असून, भोसरी येथील रुग्णालयाच्या Gas वाहिनी टाक्याच्या कामात रिंग झाली आहे. बहिरवाडे क्रीडांगण व वाकड येथील सिमा भिंतीच्या कामात गैरप्रकार घडला आहे, साध्या वारकऱ्यांनाही या सत्ताधाऱ्यांनी सोडले नसून, ताडपत्री खरेदीत गैरव्यवहार केला आहे. महापालिका मुख्यालय व प्रभाग स्तरावरील गैरप्रकारामुळे ३६० निविदा रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आली. अनधिकृत ३०० होर्डिंग काढण्यासाठी चोरीच्या मार्गाने रु. ३.५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. शिक्षण मंडळाच्या साहित्य खरेदी व्यवहारात टक्केवारी मिळाली नाही, म्हणून पदाधिकाऱ्यांनी ठेकेदाराला दमदाटी व मारहाण करण्याचा प्रकार नुकताच घडला आहे, असे अनेक गैरव्यवहार व भ्रष्टाचार महानगरपालिकेत राजरोसपणे सुरु आहेत .
आमदार व महापालिकेचे पदाधिकारी नातेवाईकांच्या व मित्र- परिवारांच्या नावाने ठेकेदारी करतात. सुरक्षा विभाग व स्वच्छतेची कामे करण्यासाठी कामगार पुरवण्याचे काम करतात, यामध्ये किमान वेतन आयोगाचा नियम न पाळता कामगारांचे शोषण करून, अल्प मोबदला देऊन, कामे करून घेतले जातात. त्यामुळे आपण भय व भ्रष्टाचारमुक्त महापालिका व पारदशर्क कारभाराची हमी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दिली होती. मात्र, मागील दोन वर्षात आपल्या संकल्पनेला तिलांजली देत महानगरपालिकेने उरफाटा कारभार केला आहे. त्यामुळे आपण नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करून, पिंपरी चिंचवड महानगरपालिका वठणीवर आणण्यासाठी हंटरमेन तुकाराम मुंढे यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर नियुक्ती करावी, अशी मागणी भापकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
















