न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हें) :- केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील सोसायट्यांनी त्यांच्याकडे निर्माण होणारा सुका व ओला कचरा वेगवेगळा करून त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार आणि सरकारच्या एप्रिल २०१७ च्या निर्णयानुसार आपले घर, परिसर, व्यवसाय आदी ठिकाणी उत्पन्न होणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे सर्वांना बंधनकारक आहे.
दररोज शंभर किलोग्रॅम अथवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण करणा-या संघटित संस्था व सोसायट्यांनी ज्यांचे क्षेत्र पाच हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आहे. त्यांनी कचरा निर्मितीच्या ठिकाणी कच-याचे वर्गीकरण करून स्वतः ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी निश्चित केलेली आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारून फक्त सुका कचरा महापालिकेकडे देण्याबाबतची माहिती देण्याची मुदत २९ सप्टेंबरपर्यंत होती. वेळ उलटून गेल्यानंतरही बहुतांश सोसायट्यांनी ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केली नसल्याचे प्रशासनाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. हा प्रकार घनकचरा व्यवस्थापन नियमातील तरतुदींचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे महापालिकेने अशा ६१५ गृहसंस्थांना नोटीसा पाठविला दिल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली आहे.










