- एका अधिकाऱ्यामुळे क्वारंटाईन सेंटरच सील करण्याची पालिकेवर नामुष्की…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जुलै. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेतील कोरोनाची लागण झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ५० पेक्षा अधिक जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यात दोन सहायक आयुक्त, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लिपिक, अभियंता, उपलेखापाल आदींचा समावेश आहे. दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या वाढत्या संसर्गामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती घटून अनेक विभागातील कामकाज अक्षरश: ठप्प झाले आहे.
पालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य, स्थापत्य, वायसीएम व भोसरी रूग्णालय, स्थापत्य, कर संकलन, भांडार, सुरक्षा, आकाशचिन्ह व परवाना, अतिक्रमण, नगरसचिव, जनसंपर्क, वाहतूक, क्षेत्रीय कार्यालय आदी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अनेक अधिकारी व कर्मचारी संसर्गाच्या भीतीने गैरहजर आहेत. परिणामी, त्या विभागाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. कोरोना प्रतिबंध व उपाययोजना तसेच, अत्यावश्यक सेवेतील कामकाज वगळता इतर कामे जवळजवळ ठप्प आहेत.
दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांना करोनाची लागण होताच मोशीतील क्वारंटाईन सेंटरच सील करण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर आली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे क्वारंटाईन सेंटर सील केल्यामुळे पालिकेच्या बेजबाबदार कारभार सर्वांसमोर आला आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या अधिकार्यांमध्ये नसलेला संवाद आणि पर्यायी व्यवस्था या संपूर्ण प्रकाराला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.या ठिकाणी विलगीकरण करण्यात आलेल्या सर्वच्या सर्व नागरिकांना थेट घरी सोडण्यात आले आहे. वस्तुत: हे सेंटर महापालिकेने उभारले आहे. एखाद्या अधिकार्याला लागण झाल्यानंतर संपूर्ण यंत्रणाच बंद करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.


















