न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जुलै. २०२०) :- शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिका प्रशासनाने खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाबाबत प्रशासनामध्ये मोठा गोंधळ आहे. आयुक्तही याबाबत स्पष्ट भूमिका घेत नसल्याने गुंता वाढला आहे. खासगी डॉक्टरांना सेवेत सामावून घ्यायचे आहे, मात्र प्रशासन त्यांना कोणतीही गोष्ट लेखी देत नाही. त्यामुळे डॉक्टर सेवा देण्यास तयार नाही.
शहरात वाढत्या रुग्णसंख्येला सेवा देता यावी यासाठी प्रशासनाने खासगी डॉक्टरांना सेवेमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मागील आठवड्यात खासगी डॉक्टरांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. त्यावर खासगी डॉक्टर आणि प्रशासन यांच्यामध्ये बैठकाही झाल्या. खासगी डॉक्टरांनी ५० लाख रुपये विमा, सुरक्षा साधने, राहण्याची व भोजनाची व्यवस्था, यामध्ये डॉक्टर बाधित झाला तर त्याच्या सर्व उपचाराच्या खर्चाची जबाबदारी घेण्याची मागणी केली होती.
या कोणत्याही गोष्टीला आयुक्त तयार झाले नाहीत. त्यानंतर शहरातील शंभर डॉक्टरांना नोटीस देत २४ तासांत सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश दिले. त्यानंतर बैठकांचे सत्र सुरु झाले. आमदार महेश लांडगे यांनी तोडगा काढत खासगी डॉक्टरांना सेवेत सामावून घेण्याबाबत चर्चा केली.


















