- पिंपरीत सुशिक्षित बेरोजगारांना प्रल्हाद मोदी यांच्या हस्ते कर्जाचे धनादेश वाटप
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हें) :- भारत देशाला महासत्ता बनविण्यासाठी नोकरी करणा-या हातांपेक्षा नोकरी देणा-या हातांची जास्त गरज आहे. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक नविन योजना आणल्या आहेत. त्यापैकी मेक इन् इंडीया, स्टार्ट अप प्रोजेक्ट, एम्एस्एम्ईचे स्वतंत्र मंत्रालय, कौशल्य विकास योजना, राष्ट्रीय पातळीवर नविन आयआयटीची स्थापना, ईशान्येतील राज्यांसह सर्व राज्यात नविन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना, देशभर राज्य व राष्ट्रीय महामार्गांचे निर्माण, देशांतील सर्व खेड्यांमध्ये पाणी, आरोग्य, रस्ते, वीज व इंटरनेट या सर्व सुविधा नागरीकांना उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार काम करीत आहे. यासाठी कुशल, अकुशल मनुष्यबळाची गरज आहे. याचे निर्माण व संघटन करण्यासाठी संकल्प फाऊंडेशन सारखा इतर संस्थांनी देखील पुढाकार घ्यावा. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ज्येष्ठ बंधू प्रल्हादभाई मोदी यांनी केले.
पिंपरीतील संकल्प फाऊंडेशनच्या वतीने सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी विविध शासकीय, निमशासकीय योजनेतून अनुदानित, विनाअनुदानित कर्ज काढून देण्यात आले. त्यापैकी बावीस बेरोजगारांना व्यावसायिक चारचाकी वाहन घेण्यासाठीचे धनादेश काळेवाडी पिंपरी येथील संकल्प फाऊंडेशनच्या कार्यालयात प्रल्हाद मोदी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, संकल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील, सचिव छाया नितीन पाटील, टोयोटा कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक संभाजी खेडेकर, सागर कहाने, दत्तात्रय मोरे, तुषार मुनोत, संदिप चिलेकर, आबासाहेब गरदाले, नितीन कांबळे, विग्नेश नायडू, सोमनाथ बो-हाडे, अमित जाधव, भरत ठाकूर आदी उपस्थित होते.
प्रल्हाद मोदी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासन गतीमान करण्यासाठी ‘परवाना राज’ बंद केले. त्यामुळे देशभर उद्योग, व्यवसाय, व्यापारासाठी लागणारे सर्व परवाने ना हरकत पत्र त्याची अर्ज प्रक्रिया आता ऑनलाईन झाली आहे. त्यामुळे मध्यस्थी दलाल बंद झाले. वेळ, पैसा वाचला शासकीय, निमशासकीय योजनेतून अनुदानित, विना अनुदानित भांडवल मिळविणे सुशिक्षित बेरोजगारांना सुलभ व सहज शक्य झाले आहे. यातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारात वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात दळवळण क्षेत्रात मोठी वाढ होईल व देशाचा जीडीपी वाढेल असा विश्वास प्रल्हाद मोदी यांनी व्यक्त केला.
स्वागत व प्रास्ताविक करताना नितीन पाटील म्हणाले की, ‘संघटन समुहातून एकमेकांच्या सहाय्यातून ध्येय गाठणे’ हे संकल्प फाऊंडेशनचे ब्रिदवाक्य आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून सुशिक्षित, बेरोजगार युवक, युवतींना मार्गदर्शन व वित्तीय सहाय्य मिळविण्यासाठी मदत करते. त्यातूनच आज बावीस युवकांना विविध शासकीय, निमशासकीय वित्तीय संस्थांतून टोयोटा कंपनीचे व्यावयायिक वाहन घेण्यासाठी अनुदानित कर्ज मिळवून देण्यात आले. फाऊंडेशनने यापुर्वी महिला सक्षमिकरण तसेच शिक्षण, आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम राबविले आहेत असे सांगितले.
स्वागत नितीन पाटील, सुत्रसंचालन नितीन कांबळे व आभार छाया पाटील यांनी मानले.
















