- मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मान्य केल्याबद्दल मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हें) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्राच्या विधिमंडळात आज एकमताने मंजूर केले. मराठा समाजाला न्याय दिल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने आमदार व भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय ईच्छाशक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविली असून, तत्परतेने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देताना एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.
यावेळी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची भावना लक्षात घेऊन, मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला. त्यामुळे भाजप सरकार हे दिलेला शब्द पाळणारे सरकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे विरोधकांची बोलती बंद झाली असून, आगामी निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नसल्याचे, आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.
आमदार महेश लांडगे यांनी देवेंद्र फडणवीस हे शब्द पाळणारे नेतृत्व आहे. दिलेला शब्द फडणवीस यांनी सत्यात उतरविला असून, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाची तरतूद, विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर, सर्व विरोधकांचा संपूर्ण पाठिंबा आदी गोष्टी फडणवीस सरकारने लीलया पार केल्या व अनेक अडथळीच्या शर्यती पार करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले, त्यामुळे भाजप सरकार विश्वासाहार्य सरकार असल्याचे आणखी एकदा सिध्द झाले असल्याचे, आमदार लांडगे यांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून अनेक सवलती मिळणार असून, यात मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) म्हणून घोषित, विशेष प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळणार, मराठा समाज भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १५ (४) व १६ (४) मध्ये समाविष्ट केलेले आरक्षणाचे लाभ व फायदे मिळण्यास हक्कदार असणार, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळता इतर शैक्षणिक संस्था आणि अनुदानित अथवा विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील एकूण जागांच्या १६ टक्के आरक्षण मिळणार.
राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील आणि पदांवरील सरळसेवा प्रवेशाच्या एकूण नियुक्त्यांच्या १६ टक्के आरक्षण मिळणार, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मिळणार आरक्षण, मराठा समाजाची लोकसेवांमधील पदांवर प्रवेश नियुक्त्यांमध्ये मिळणार जागा, उन्नत आणि प्रगत गटाखालील व्यक्तींना आरक्षण मिळणार, आदी सवलती या आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला मिळणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठा समाजाने जल्लोष करण्याची ही योग्य वेळ असल्याचे, भाजपच्या दोन्ही आमदारांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना सांगितले.
















