- अनधिकृत होर्डिंगवाले आणि फुकट्या जाहिरातबाजांसाठी विरोधकांकडून भाजपावर बिनबुडाचे आरोप
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हें) :- पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत होर्डिंग हटविण्याच्या ठेक्याशी भाजपाच्या कोणत्याही पदाधिका-याचा संबंध नाही. तसेच होर्डिंग हटविण्याचा खर्च संबंधित होर्डिंगवाल्यांकडून वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे याबाबत पूर्ण माहिती घेऊन विरोधकांनी शहानिशा करावी, जेणेकरून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल. महापालिकेतर्फे अनधिकृत होर्डिंग हटविण्यात येत असल्याने अशा होर्डिंगवाल्यांची आणि फुकट्या जाहिरातदारांची दुकानदारी बंद झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपवर बेछुट आणि बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. असे न करता सबळ पुरावे सादर करावेत, असे आव्हान भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.
शहरातील अनधिकृत होर्डिंग हटविण्याबाबत महापालिका न्यायालयाच्या निर्देशानुसार धोरण राबवित आहे. होर्डिंग हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने रितसर कायदेशीर बाबींची पुर्तता करून निविदा प्रक्रिया राबवून त्याचा ठेका दिलेला आहे. यात सत्ताधारी म्हणून भाजपाचा कोणताही हस्तक्षेप नाही. भाजपाच्या कोणत्याही पदाधिका-याचा होर्डिंग हटविण्याच्या ठेक्याशी कोणताही संबंध नाही. मात्र विरोधासाठी कोणताही मुद्दा नसल्याने विरोधकांकडून होर्डिंग हटविण्याच्या विषयाचे राजकारण करण्यात येत आहे. बिनबुडाचे आरोप करून शहरवासीयांचे लक्ष विचलीत करण्याचा विरोधकांचा हा अयशस्वी प्रयत्न आहे, असे भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे. पत्रकात नमूद केले आहे की, शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यांवर अनधिकृत होर्डिंगची समस्या आहे. या होर्डिंगमुळे शहराच्या सौंदर्यास बाधा पोहचत आहे. त्यासाठी हे होर्डिंग हटविणे आवश्यक आहे. त्याबाबत महापालिका धोरण राबवित असून कार्यवाही करीत आहे.
शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर घालणारे प्रकल्प राबविण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनधिकृत होर्डिंग हटविण्यात येत आहेत. अशा होर्डिंगमुळे शहराच्या सौंदर्यास बाधा पोहचत आहे. पुण्यात अशा होर्डिंगमुळे अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. वादळी पावसामुळे आपल्या शहरातील काही होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन खबरदारीची उपाययोजना म्हणून अनधिकृत होर्डिंग हटवित आहे. त्यामुळे अशा अनधिकृत होर्डिंगवाल्यांचे धाबे दणाणले आहे. अशा होर्डिंगवाल्यांची आणि फुकट्या जाहिरातदारांची दुकानदारी बंद झाल्याने त्यांच्याकडून काहूर माजविण्यात येत आहे. विरोधकांशी हातमिळवणी करून भाजपाविरोधात चुकीचा प्रचार करण्यात येत आहे. त्यासाठी बेछुट आणि बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत.
अनधिकृत होर्डिंगमुळे महापालिकेचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. तसेच हे होर्डिंग धोकादायक असल्याने मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे असे होर्डिंग हटविण्यात यावेत, अशी शहरवासीयांची मागणी आहे. या जनरेट्यामुळे महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग हटविण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. शहरात सर्वत्र अधिकृत होर्डिंग राहिल्यास महसुलात मोठी वाढ होईल. त्यासाठी महापालिका प्रशासन होर्डिंगसाठीचे धोरण काटेकोरपणे राबविण्यावर भर देत आहे. नेमकी हीच बाब विरोधकांना आणि फुकट्या जाहिरातबाजांना खटकत आहे. त्यामुळे असे आरोप करण्यात येत आहेत, असे आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.
















