- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२०) :- मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मराठा आरक्षणाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणी ही सुनावणी पार पडली. सकाळी ११ वाजता या प्रकरणी सुनावणी सुरू झाली. परंतु यावेळी सरकारी वकील मुकुल रोहतगी हे अनुपस्थित होते. परंतु त्यानंतर काही काळासाठी न्यायालयानं ही सुनावणी स्थगित केली.
दरम्यान, सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला. आरक्षणाला स्थगिती देताना प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्यात आलं होतं. परंतु आजची सुनावणी नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे पार पडली. याच खंडपीठाकडून आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती.
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी यासंबंधी बोलताना ज्या खंडपीठाने स्थगिती दिली त्यांच्यासमोर सुनावणी न होता दुसऱ्या खंडपीठासमोर घेण्यात यावी अशीही विनंती करणार असल्याचं म्हटलं होतं. “मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हायला हवी ही फक्त सरकारचीच नाही तर सर्व याचिकाकर्त्यांची भूमिका आहे,” असंही अशोक चव्हाण म्हणाले होते.