- पक्षनेत्यांच दालन आज दणाणल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपमध्ये सर्वच काही सुरळीत नसल्याचा प्रकार आज दिसून आला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्या वाकड प्रभागातील विकासकामावर आमदार जगताप यांनी अप्रत्यक्षपणे हरकत घेतली होती. मात्र, कलाटे यांनी प्रत्यक्ष राज्य सरकारलाच मध्यस्थी करायला लावून आमदार जगताप यांनाच शह दिला. याचाच प्रत्यय आज बुधवारी महापालिकेत दिसून आला. आमदारांचे समर्थक व भाजप पदाधिकारी, माजी नगरसेवक व स्वीकृत नगरसेवक यांनी पक्षनेत्यांच्या दालनात जाऊन गोंधळ घातला. तसेच पक्षनेते नामदेव ढाके यांना खडसावत ‘आयुक्त सांभाळता येत नसेल तर घरी बसा’ असा सल्ला देत, जोरजोरात मोठ्या आवाजात पक्षनेत्याचा दरवाजा जाेराने आपटून आपला राग व्यक्त केला, असे प्रत्यक्षदर्शिनी पहिले आहे.
वाकड येथील रस्त्यांच्या कामांचा विषय स्थायी समितीने काही आठवड्यांपूर्वी फेटाळला होता. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा विषय शासनाकडे रस्त्याच्या आवश्यकतेसह व शेरांकनासह पाठविला आहे. लेखी अभिवेदन करण्याची जबाबदारी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांनी आमदार जगताप आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या वादात न पडता अलिप्तपणे पत्र तयार करून राज्य शासनाला पाठविले. याचाच राग मनात धरून चिंचवड मतदार संघातील विषयात ढवळाढवळ केल्याने भाजप पदाधिकारी आणि स्वीकृत नगरसेवक यांनी पक्षनेत्यांना जाब विचारला. पक्षनेत्यांच्या दालनातील शिविगाळ बाहेरही स्पष्टपणे ऐकू येत होती. स्थायी अध्यक्ष संतोष लोंढे हे भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांचे समर्थक असल्याने त्यांना यांनी बोलण्याचे धाडस दाखवले नाही. सर्व राग सभागृहनेते नामदेव ढाके यांच्यावर काढण्यात आला, अशी चर्चाही पालिका आवारात सुरु होती.
दरम्यान पक्षनेते नामदेव ढाके यांनी सारवासारव करीत, असा प्रकारच घडला नसल्याचे सांगितले आहे. आम्ही गप्पा मारीत होतो. त्यामुळे मोठ्याने आवाज ऐकू आला असेल, असे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे. यावरून मात्र, शहर भाजपमध्ये सर्वच आलबेल नसल्याचे दिसत आहे. स्थायी अध्यक्ष यांना बोलणे गैर वाटल्यानेच पक्षनेत्यांवर सर्व बिल फाडले गेले. थोडक्यात काय तर ‘वडय़ाचं तेल वांग्यावर निघाले’.












