न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ नोव्हेंबर २०२०) :- येरवड्यातील तात्पुरत्या कारागृहात असलेल्या दोन कैद्यांमध्ये किरकोळ कारणावरुन वादावादी झाल्यामुळे एका कैद्याने दुसऱ्य़ाच्या डोक्यात थाळी मारुन जखमी केले आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली.
तेजस येनपुरे (वय १९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सोहेल शेख (वय १९) असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी सत्वशिल पाटील यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस आणि सोहेल येरवड्यातील तात्पुरत्या कारागृहात बंदीवान आहेत. दोन दिवसांपुर्वी रात्री साडेनउच्या सुमारास सोहेलने तेजसला तू गुन्हा कसा केलास याबाबतची माहिती विचारली. त्यावेळी तेजसने सोहेलला माहिती दिली. मात्र, तू खोटे बोलत आहे, असा आरोप सोहेलने केल्यामुळे तेजसने त्याला मारहाण करुन जेवण्याच्या थाळीने सोहेलचे डोके फोडले.