न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. नोव्हेंबर २०२०) :- पैशांवरून इंजिनीअर तरुणाचे अपहरण करण्यात आले. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता त्याचे अपहरण करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी दुपारी त्याची सुटका करण्यात आली.
रिक्षाचे पैसे देण्यावरून चार जणांनी मिळून एका तरुणाचे अपहरण केले. तरुणाला धमकावून त्याच्या क्रेडिट कार्डवरून दारू खरेदी केली. त्यानंतर अपहरण केलेल्या तरुणाच्या भावाकडे २५ हजार रुपयांची खंडणी मागितली. शुक्रवारी (२० नोव्हेंबर) संध्याकाळी पाच ते शनिवारी (२१ नोव्हेंबर) दुपारी बारा वाजताच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरात हा प्रकार घडला. पोलिसांनी अपहरण करणाऱ्या चौघांना अटक केली आहे.
सिकंदर उर्फ महंमद रफिक इस्माइल नदाफ (३२, रा. वल्लभनगर, पिंपरी. मूळ रा. निगडी), कुमार पांडागळे (३२, रा. दळवीनगर, निगडी), अमित गायकवाड (२५, रा. संत तुकारामनगर, पिंपरी), प्रमोद उर्फ पप्पू फुलपगारे (३४, रा. गांधीनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मनीषकुमार भगत (२४, रा. नाणेकरवाडी, ता. खेड. मूळ रा. झारखंड) असे अपहरण आणि सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने याबाबत शनिवारी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.