- प्रदेश पातळीवरून सहकार्य मिळत नसल्याचा कांगावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२०) :- काँग्रेसच्या पिंपरी – चिंचवड शहराध्यक्षपदासाठी मंगळवारी मुलाखती झाल्या. या वेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निरीक्षकांपुढे आग्रही भूमिका मांडली. प्रदेश पातळीवरून सहकार्य मिळत नसल्याने शहरात पक्षबांधणी व विस्तारात अडचणी येत आहेत. त्यामुळे नव्याने शहराध्यक्षांची निवड करताना तरी पक्ष संघटन मजबूत कसे होणार, असा सवाल पदाधिकारी यांनी उपस्थित केला.
महापालिकेत सुरवातीच्या काळात काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र, सद्य:स्थितीत शहरात काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. तसेच प्रदेश पातळीवरून सहकार्य मिळत नसल्याचे नाराज झालेल्या सचिन साठे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे शहराध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी निगडी येथे मुलाखती झाल्या. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा आणि नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर यांनी निरीक्षक म्हणून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
मुलाखतीसाठी काही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह सकाळपासून गर्दी करून शक्तिप्रदर्शन केले. निरीक्षकांनी ब्लॉक अध्यक्ष, सेवादल, महिला काँग्रेस तसेच विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच काही कार्यकर्त्यांशीही संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. अध्यक्ष कोणीही असला तरी, प्रदेश पातळीवरून सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. शहरात पक्षाचे कामकाज करताना अडचणी येतात. महापालिकेत सुरवातीच्या काळात काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र, काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. त्याबाबत चिंतन झाले पाहिजे. तसेच बदलाची अपेक्षा व्यक्त करताना काही कार्यकत्यांनी स्थानिक पातळीवर वरिष्ठांनी लक्ष घालण्याची विनंती केली.