- संविधान भवन, प्रदर्शन केंद्राचे पालिकेकडे हस्तांतरण व आयुक्तालयासाठी जागेची मागणी…
- आमदार महेश लांडगे यांची विभागीय आयुक्तांसमवेत बैठक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाचे शहरात पहिले संविधान भवन आणि औद्योगिक प्रदर्शन केंद्राचे कामही सुरू आहे. हे महापालिकेकडे त्वरित प्रकल्प हस्तांतरित करावे, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाअंतर्गत शहरातील प्रस्तावित प्रकल्पांबाबत प्राधिकरणाचे अध्यक्ष, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासोबत बैठक घेतली. या वेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली.
आमदार लांडगे म्हणाले, प्राधिकरणाचा समावेश आता ‘ पीएमआरडीए ‘ मध्ये करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे प्रदीर्घ कार्यक्षेत्र आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे पिंपरी – चिंचवड शहरातील दीर्घ विकासकामांवर परिणाम होणार आहे. प्राधिकरणाच्या स्थापनेपासून अद्यापही अनेक आरक्षणांचा विकास झालेला नाही. तसेच, सुरू असलेल्या प्रकल्पांना गती मिळालेली नाही. पीएमआरडीएमध्ये प्राधिकरणाचे विलीनीकरण झाल्यास सुरू असलेले प्रकल्प आणखी रखडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे संविधान भवन आणि औद्योगिक प्रदर्शन केंद्र हे प्रकल्प महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याची गरज आहे.
भोसरी मतदारसंघातील प्राधिकरणाच्या ताब्यात असलेले मोकळे भूखंड महापालिकेस हस्तांतरण करण्यात यावे. भूखंड महापालिकेच्या ताब्यात आल्यास तातडीने विकासकामे करून नागरिकांच्या हितासाठी अनेक प्रकल्प उपयोगात आणता येतील, अशीही चर्चा झाली.
पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्ताल दोन वर्षांपूर्वी परवानगी मिळाली. तेव्हापासून राज्य सरकार पोलीस मुख्यालयाच्या जागेचा शोध घेत आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या हद्दीतील मोशी – चिखलीतील जागा पोलीस मुख्यालयाला देण्यात यावी. या जागेमध्ये प्रशस्त इमारत उभी करण्यात येऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल, अशी मागणीही त्यांनी केली.














