आगामी नगरपालिका, महापालिकांची निवडणूक लढविणार एकत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२०) :- विधान परिषद निवडणुकीता महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर आता १५ जानेवारीला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज्यातील १०० नगरपालिका आणि पाच महापालिकांची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.
भाजपच्या विरोधात तिन्ही पक्ष एकत्र आले तर चांगले यश मिळू शकते याचा अंदाज तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आला असून सध्याची परिस्थिती महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे. महापालिका व नगरपालिकांची निवडणूक लवकरात लवकर घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे मानले जाते. पाच महापालिकांमध्ये औरंगाबाद, कोल्हापूर, नवी मुंबई, वसई – विरार आणि कल्याण – डोंबिवलीचा समावेश आहे.
राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पाचही महापालिकांचा कार्यकाळ आधीच संपला आहे. जवळपास नगरपालिका / नगरपंचायतींचा कार्यकाळ संपला आहे किंवा संपत आहे. सर्व निवडणुका एकत्रितपणे लढण्याची महाविकास आघाडीची भूमिका आहे व ती कायम राहील.














