- रुग्णांसाठी पालिकेकडून वाकडच्या हॉटेल जिंजर व सयाजीमध्ये सोय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२०) :- कोविड – १९ या आजारास जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक महामारी घोषीत केले आहे. राज्यामध्ये अधिसुचनेच्या दिनांकापासून साथरोग अधिनियम, १८९७ ची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. दरम्यान २१ डिसेंबर, २०२० पासून नवीन उत्परिवर्तन करणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदेश निर्गमित केले आहेत.
कोविड विषाणुची लागण युनायटेड किंगडम (यूके) मध्ये पसरत असुन ही साथ वेगाने वाढत असुन एसएआरएस – सीओव्ही चे स्वतंत्र फिलोजेनेटिक क्लस्टर सापडले आहे. हे पाहता, यूकेकडून भारतात येणारी सर्व विमान उड्डाणे तात्तपुर्ती दिनाक २२ डिसेंबर २०२० चे मध्यरात्री पासून दिनांक ३१ डिसेंबर २०२० चे मध्यरात्री पर्यंत निलंबित करण्यात आली आहेत.
थेट किंवा अप्रत्यक्ष उड्डाणाद्वारे यूकेहून येणाऱ्या सर्व प्रवाश्यांचे हॉटेल जिंजर, वाकड व हॉटेल सयाजी वाकड येथे प्रवाशांच्या स्वखर्चान सात दिवसासाठी संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे. प्रवासी येताना लक्षणे आढळून आल्यास त्यास पुढील उपचारासाठी त्याला थेट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नविन भोसरी रुग्णालय येथे दाखल करावे. प्रवाशांचे आगमन झाल्या-झाल्या आरटी – पीसीआर चाचणी करण्यात येणार नाही. तथापि, पाचव्या ते सातव्या दिवसादरम्यान विलगीकरण केलेल्या प्रवाशांना स्वखर्चाने हॉटेलमध्ये आरटी – पीसीआर चाचणी करुन घ्यावी लागेल.
चाचणीचा अहवाल नकारात्मक आढळल्यास सदर प्रवाश्याला पाच ते सात दिवसांनी संस्थात्मक विलगीकरण कक्षातुन सोडण्यात येईल, तसेच सदर प्रवाशास सात दिवसांचे अनिवार्य होम क्वारन्टाईन व्हावे लागेल. जर आरटी – पीसीआर चाचणीचा निकाल सकारात्मक परंतु लक्षणे नसलेला आढळला तर त्याच हॉटेलमध्ये त्याचे विलगीकरण करण्यात येउन सदरचे विलगीकरण १४ दिवसापर्यंत त्याच हॉटेलमध्ये अथवा पिपरी चिंचवड महानगरपालिकेचे नविन भोसरी रुग्णालयात सुरू ठेवण्यात येईल येणाऱ्या सर्व प्रवाश्याची वाहतूक व्यवस्था पि एम पि एम एल यांचे मार्फत करण्यात यावी. हॉटेलच्या शुल्कानुसार प्रवाशांना हॉटेलचे शुल्क आकारले जाईल, सर्व प्रवाशांचे पासपोर्ट हॉटेलमध्ये जमा केले जातील आणि संस्थात्मक विलगीकरण संपल्यावर हॉटेल सोडताना ते परत देण्यात येतील.
सदर प्रवाशांची आरटी – पीसीआर चाचणी खाजगी प्रयोगशाळामार्फत करणेत येऊन त्याबाबतचे शुल्क प्रवाशांकडुन वसुलात आणावे. उपरोक्त नमुद सुचना युके वरून येणाऱ्या सर्व प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासाची योजना विचारात न घेता लागु राहील. कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे निर्गमित करणेत आलेल्या आदेशाचे उल्लंघन करणारा व्यक्ती, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ अन्वये दंडनिय अपराध केला असे समजून कारवाईस पात्र राहील.


















