- त्यांच्याकडून कामे काढली; कमी दराच्या निविदाधारकांकडे कामांचा सपाटा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२०) :- पिपरी – चिंचवड महापालिकस बोगस एफडीआर (परफॉर्मन्स डिपॉझिट रिसीट) व बँक गॅरंटीचे बोगस प्रमाणपत्रे दिलेल्या १८ दोषी ठेकेदारांवर कारवाईचा फास पालिका प्रशासनाने आवळला आहे. त्यांच्याकडील तब्बल १६ कामे काढून घेण्यात आली असून, ती कामे दुसऱ्या क्रमांकावरील लघुत्तम दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांना देण्यात आली आहेत. लवकरच दोषी ठेकेदारांच्या विरोधात फौजदारी गुन्हे नोंदविले जाणार असल्याचे शहर अभियंता राजन पाटील यांनी मंगळवारी (दि. २९) सांगितले.
निविदेत पात्र ठरलेले ठेकेदार पालिकेकडे एफडीआर व बँक गॅरंटी प्रमाणपत्र सादर करतात. काही ठेकेदारांनी एफडीआर व बँक गॅरंटीचे बोगस प्रमाणपत्र व पालिकेकडे सादर केल्याची तक्रार पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली होती.
त्यानुसार गेल्या ३ वर्षांतील प्रमाणपत्रे तपासणीचे आदेश आयुक्तांनी सर्व विभागास दिले. स्थापत्य विभागातील १८ ठेकेदारांचे बँक गॅरंटी व एफडीआरची एकूण ६४ प्रमाणपत्रे बोगस असल्याचे आतापर्यंत आढळून आले आहे, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कार्यकारी अभियंत्यांमार्फत पोलिसांकडे रितसर फौजदारी तक्रार नोंदविली जाणार आहे, असे राजन पाटील यांनी स्पष्ट केले.












