- स्थायी समितीकडून तो विषय तहकूब..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२१) :- कोरोना महामारी संकटाचा फायदा घेत कोविड केअर सेंटर, कोरोनाग्रस्तांना जेवण, नाश्ता व आवश्यक साहित्य, मास्क व पीपीई किटचा पुरवठा, वैद्यकीय साहित्याचा पुरवठा या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची बिले महापालिकेला सादर केली आहेत. मात्र, कोरोनाच्या नावाखाली काढलेल्या या कोट्यवधीच्या बिलांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे.
बंद कोविड केअर सेंटरच्या नावाखाली काम न करताच बिले काढून आर्थिक लूट सुरू आहे. त्या खर्चाबाबत योग्य माहिती दिली जात नसल्याने बिले मंजूर न करता ते सर्व विषय पुन्हा तहकूब केले. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
अनेक कामांची बिले अदा करण्यात आली. मात्र, उर्वरित बिले पालिकेला सादर करण्यात आली. त्यामध्ये कोविड सेंटरसाठी ६ कोटी ९१ लाख ११ हजार ५०० रुपयांची बिले आहेत. तीन महिन्यांचे आदेश असताना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सेंटर बंद करण्यात आले. काम न केलेल्या कालावधीतील ६५ टक्के प्रमाणे बिले अदा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यापैकी काही रुग्णालय, सेंटर चालकांना एकही दिवस काम न करता त्या प्रमाणे कोट्यवधींची बिले दिली जाणार आहेत.
त्यात स्पर्श मल्टिस्पेशालिटी या एकाच रुग्णालयाला दोन सेंटरसाठी एकूण ३ कोटी २९ हजार ४० हजार रुपयांची बिलाचा समावेश आहे. याबाबत स्थायी समितीने वारंवार माहिती मागवूनही प्रशासनाकडून दिली जात नाही, तर, शिवसेना सदस्य राहुल कलाटे यांनी या बिलामध्ये शंका उपस्थित होत असल्याने विरोध केला. माहितीसाठी स्थायीने हे विषय पुन्हा तहकूब केला आहे.