- मालमत्ता जप्तीच्या नोटीसीसंदर्भात मुंबईत आयुक्तांबरोबर बैठक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड येथे कार्यरत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती संचलित पुनरूत्थान समरसता गुरूकुलम् या शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगिण विकास प्रकल्पाच्या क्षेत्राला किमान करनिर्धारणा देण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांना निर्देश दिले आहेत.
पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना मालमत्ता जप्तीच्या नोटीससंदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांची विधानभवन, मुंबई येथे बैठक आयोजित केली होती. प्रभुणे यांच्या संस्थेने मालमत्ता कर भरला नाही म्हणून जप्तीची नोटीस काढण्यात आली होती. याबाबत सदरील नोटिसला डॉ. गोऱ्हे यांनी तात्काळ मध्यस्थी केल्यानंतर नोटिसास स्थगिती मनपाने दिल्याबद्दल प्रभुणे यांनी आभार मानले. तसेच पिंपरी चिंचवड येथील अनुदानित शैक्षणिक संस्थांना कर माफी देण्याबाबत काही निर्णय घेता येईल का याचा विचार करण्याची सूचना देखील डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केली.
या आयोजित बैठकीस पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त, श्री.श्रावण हार्डीकर, नगरविकास विभागाचे उप सचिव, श्री.सतीश मोघे, ॲड.सतीश गोरडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
चिंचवड येथील क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती संचलित सर्व शैक्षणिक, सामाजिक प्रकल्पांतर्गत ३००० हजार मुले शिक्षण घेत असून या ठिकाणी क्रांतीवीर चाफेकर विद्यामंदिर व क्रांतीवीर चाफेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे सर्व चिंचवड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी १ ली ते १२ वी पर्यंत शिक्षण देणारी सामाजिक शैक्षणिक संस्था असून चिंचवड गावठाणालगत आहे. सदरची जमीन चाफेकर स्मारक समितीच्या मालकीची असून या जागेचा गावठाणामध्ये समावेश करण्याची शक्यता पडताळावी अशा सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी केली आहे.