- सांगवीत अनधिकृत बांधकाम विभागाकडून ७ बांधकामांवर कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२१) :- महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने सांगवी येथील ममतानगर व मुळा नदीकाठच्या रस्त्यावरील ७ अनधिकृत आरसीसी बांधकामांवर बुधवारी (दि. १०) कारवाई करण्यात आली. कारवाईत एकूण ११ हजार ३०० चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्यामार्गदर्शनाखाली सहशहर अभियंता मकरंद निकम व कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. उपअभियंता हेमंत देसाई, सुर्यकांत मोहिते, सुधीर मोरे, ५ कनिष्ठ अभियंता व १५ बीट ऑफीसर, वरिष्ट पोलिस निरीक्षक, २ पोलिस उपनिरीक्षक, ३४ आरसीपी जवान उपस्थित होते.
कारवाईसाठी ३ पोकलेन, ६ जेसीबी, २ डंपर २४ मजूर व अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू केल्याने इमारतीमध्ये राहणाऱ्यांना साहित्य व सामान काढता आले नाही. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय झाली.
डोळ्यासमोर राहते घर जमीनदोस्त करण्यात आल्याचे पाहून काही महिलांना भोवळ आली. तर, अनेकांना अश्रू रोखता आले नाहीत. कारवाईनंतर रहिवाशांनी सुरक्षित राहिलेले ते, साहित्य काढून घेण्याचा प्रयत्न केला.














