- स्थायीत वर्णी लागावी म्हणून दोन्ही आमदारांना घातली गळ..
- अन्यथा पिंपरी विधानसभेतील नगरसेवकांसह इतर १५ नगरसेवक बंडाच्या पवित्र्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपूष्टात आला आहे. उद्या होणा-या स्थायी समिती सभेत नवीन सदस्यांची निवड होणार आहे. नवीन सदस्यांना अवघे एकच वर्ष स्थायीत काम करायला मिळणार आहे. त्यामुळे अनेक नगरसेवकांना स्थायीत संधी मिळण्याची अपेक्षा लागली आहे. संधी न मिळाल्यास पिंपरी विधानसभेतील नगरसेवकांसह भाजपचे १५ ते १६ नगरसेवक बंडखोरीच्या तयारीत आहेत. त्यातील एका नगरसेविकेने शहरातील सत्ताधा-यांच्या कारभाराला कंटाळून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्याचे समजते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील सत्ताधारी भाजपला मोठ्या प्रमाणात गळती लागण्याची दाट शक्यता आहे.
स्थायी समितीची सदस्यसंख्या १६ आहे. त्यामध्ये भाजपचे १०, राष्ट्रवादीचे ४, शिवसेना १ आणि अपक्ष आघाडीचा एक असे संख्याबळ आहे. भाजपची सत्ता आल्यानंतर पाच वर्षात स्थायी समितीमध्ये प्रत्येक नगरसेवकाला संधी देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला होता. पहिल्या वर्षात स्थायीच्या १० आणि अपक्ष एक अशा ११ सदस्यांचे भाजपकडून राजीनामे घेण्यात आले होते. दरम्यान, दुस-या वर्षात तसे न करता सदस्यांना दोन वर्ष काम करण्याची संधी देण्यात आली. आता शेवटच्या वर्षात प्रथम वर्षाप्रमाणे सर्वांचे राजीनामे घेण्याची शक्कल पक्षाच्या धुरीणांनी लढविली आहे.
ऐनवेळची बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या वर्षामध्ये नाराजांना देखील संधी देण्याचा विचार केला जात आहे. स्थायीचे हुकीमी एक्का मानले जाणारे सभापती संतोष लोंढे, सदस्या आरती चोंधे, केवळ स्वाक्षरीसाठी उपस्थिती लावणारे शीतल शिंदे, राजेंद्र लांडगे यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीला संपतो आहे. तर, भाजपाचे नगरसेवक शशिकांत कदम, अभिषेक बारणे, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक राहिला आहे. नाराज नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याने या सहा नगरसेवकांना राजीनामे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांना एकच वर्ष काम करायला मिळणार आहे.
अनेक नगरसेवकांना मागणी करून देखील स्थायी समितीमध्ये संधी मिळाली नाही. तर, काहींना वेगळ्या गटाचा असल्याचा शिक्का मारून त्यांना चार वर्षे बाजुला ठेवण्यात आले. आता शेवटचे वर्ष राहिल्याने त्यांना शहरातील पक्षाच्या नेतृत्वाकडून संधी मिळण्याची आपेक्षा लागली आहे. यावेळी संधी मिळाली नाही, तर पंधरा ते सोळा नगरसेवकांनी भाजपच्या विरोधात बंडखोरी करण्याची तयारी केली आहे. त्यातील चिंचवडच्या एका नगरसेविकेने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेऊन पूर्वनियोजन केल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी विधानसभेतील नगरसेवकांसह पंधरा ते सोळा नाराज नगरसेवकांची मनधरणी करण्यात भाजपच्या पदाधिका-यांना यश येईलच असे नाही. कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नकार द्यायचा, याबाबत भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे पक्षाला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. नाराज नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर जाण्याच्या तयारीत आहेत, अशी पदाधिका-यांत चर्चा सुरू आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.


















