आता पालिकेची अभय योजना ३१ मार्चपर्यंत लागू राहणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२१) :- शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना विलंब दंडावर ७५ टक्के सलवत ३१ मार्चपर्यंत देण्यात येणार आहे. थकबाकीची संपूर्ण रक्कम एकरकमी भरल्यास ही सवलत दिली जाणार आहे. या अभय योजनेचा थकबाकीदारांनी लाभ घेऊन मिळकतकर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी रविवारी (दि. २८) केले.
कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे शहरातील नागरिक व उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे महापालिकेने मिळकत करातील विलंब दंडात ७५ टक्के सवलत अभय योजना सुरू केली आहे. त्याची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत होती. त्याला आणखी १ महिना मुदतवाढ देण्यात आली आहे.
थकबाकीदार आणि अनधिकृत बांधकामधारकांनी शास्तीकर वगळून संपूर्ण थकबाकी एकरकमी भरून सवलतीचा लाभ घ्यावा. नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेची सर्व १६ कर संकलन कार्यालये साप्ताहिक सुटीच्या दिवशी रविवारीही सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत खुली राहणार आहेत.