- जलपर्णी हटविण्यासाठी मुख्य सभागृहासमोरच मांडला ठिय्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नदीतील वाढत्या जलपर्णीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना नगरसेवक सचिन भोसले यांनी गळ्यात जलपर्णीचा हार घालून प्रशासनाचा निषेध व्यक्त करत महापालिकेच्या मुख्य सभागृहासमोर ठिय्या मांडला.
वारंवार प्रशासनाला याबाबतीत तक्रारी करूनही दखल घेतली जात नसून नागरिकांचे आरोग्य रामभरोसे सोडले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अखेर आज आंदोलनाच्या माध्यमातून सचिन भोसले यांनी नदीपात्रातील जलपर्णीच्या विळख्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. यावेळी सभागृहात येऊ दिले जात नसल्याने सचिन भोसले आक्रमक झाले व त्यांची सुरक्षारक्षकांसोबत झटपट झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सचिन भोसले यांच्याशी चर्चा करत लवकरच जलपर्णी काढण्यात येईल. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश देण्यात येतील असे आश्वासन दिले. पिंपरी चिंचवड शहरात पवना, इंद्रायणी या दोन नद्या आहेत. दोन्ही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी व डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. लवकरात लवकर जलपर्णी काढली नाही तर अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नगरसेवक सचिन भोसले यांनी दिला आहे.















