- आयुक्त राजेश पाटील यांच्या पुस्तकभेटीने मुले भरावली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवडमधील कचरावेचकांच्या १०वी, १२वी, डिप्लोमा आणि ग्रॅजुएशन च्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ३० मुलांचा कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीतर्फे १९ मार्च २०२१ रोजी सत्कार करण्यात आला. “ज्योती सावित्रीची लेक” नामक हा कार्यक्रम भोईर लॉन येथे संपन्न झाला.
कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत (केकेपीकेपी) ही पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शहरांतील घरे, रस्ते, कचराकुंड्या आणि इतर सार्वजनिक ठिकाणांमधून कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करणाऱ्या कचरावेचकांची संघटना आहे. कचरावेचक व त्यांची मुले यांना सन्मानपूर्ण जीवन जगता यावे या उद्देशाने १९९३ साली केकेपीकेपी ची स्थापना झाली. सत्कार झालेल्या मुलांपैकी अनेकजण त्यांच्या कुटुंबातील शिकणारी किंवा ग्रॅजुएट होणारी पहिलीच पिढी आहेत. दुरावस्थेतील घरे, अनियमित पाणी व वीज पुरवठा, मोबाईल किंवा लॅपटॉप यासारखी साधने न परवडणे, अशा अनेक कमतरतांचा सामना त्यांनी केला आहे. गणेश संपंगे ह्याने १०वीत, तर प्रज्ञा कांबळे हिने १२वीत, ७०% हून अधिक गुण मिळविले आहेत.
ताई मी कलेक्टर व्हयनू ही जीवन संघर्षाची आत्मकथा लिहिलेल्या राजेश पाटील (भा प्र से ) यांनी पुस्तकाची भेट देवून कचरा वेचक कुटुंबातील शिकणाऱ्या मुलांना प्रेरणा दिली. “परीक्षा देताना आपली परिस्थीती कोणी विचारत नाही. शिकायचं, भक्कम व्हायचं. शिकलं तरच भविष्य उज्वल होणार” म्हणत त्यांनी सीमा जाधव आणि कोमल बोराडे यांचा सत्कार केला. प्रत्यक्ष उपस्थित होणे शक्य नव्हते त्यामुळे त्यांनी सर्व मुलांसाठी व्हीडीयो द्वारे निरोप दिला. “कष्ट करणे आणि सकारात्मक विचार ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे आणि त्यातूनच जीवन घडतं“ असे त्यांनी सांगितले. मुलांनी आपल्या भाषणांमधून आपल्या येथवरच्या प्रवासातील अनुभव सांगितले व आपल्याला सतत प्रोत्साहित करीत असलेल्या आपल्या पालकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या वर्षी १२वी उत्तीर्ण झालेली प्रज्ञा लव्हे म्हणाली, “मला माझ्या आईचा अभिमान वाटतो आणि आज तिच्यामुळेच मी तुम्हा सर्वांसमोर उभी आहे. मला उच्चशिक्षण पूर्ण करायचे आहे आणि त्यासाठी माझी तयारी आहे.” रुक्मिणी देठे ह्या कचरा वेचून आपल्या नातवंडांना शिकवतात. त्या म्हणतात “आम्ही स्वतः शिक्षण घेऊ शकलो नाही परंतु शिक्षणाची जाणीव आम्हाला नक्कीच आहे. आमचे कष्ट हे आमच्या पुढच्या पिढीसाठी आहे. मला खात्री आहे की ते त्यांच्या पायांवर उभे राहतील”.















