- शहरातील विद्यार्थी व उदयोन्मुख कलाकारांना संगीतमय व्यासपीठ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. मार्च २०२१) :- महापालिका सर्वसाधारण सभेत महापालिका आणि महेश काळे स्कूल ऑफ म्युझिक यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत अकादमी सुरू करण्याचा विषय मंजूर करण्यात आला. पालिकेच्या कला, साहित्य व सांस्कृतिक समितीकडून सभेत ठराव मांडण्यात आला. महापालिकेच्या वतीने सध्या निगडी, चिंचवड, संभाजीनगर, संत तुकारामनगर येथे संगीत अकादमी चालविल्या जातात. या संगीत अकादमीमध्ये शाखीय गायन, सुगम गायन, तबलावादन, हार्मोनियम वादन आदी विषय शिकविले जातात.
या संगीत अकादमीमध्ये प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय, मुंबई या अधिकृत संस्थेमार्फत परीक्षेस बसविले जाते. संगीत अकादमी सुरू झाल्यापासून अद्यापपर्यंत अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय, मुंबई याच्या प्रारंभिक ते विशारद या परीक्षांमध्ये अदाजे १५०० विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
पिंपरी- चिंचवड शहराचा आता स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला असून, शहरात कला संगीत अकादमीचे काम निरंतर चालवण्यासाठी महेश काळे यांनी १ डिसेंबर २०२० रोजीच्या ई – मेलद्वारे शहरातील विद्यार्थी व उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणेसाठी महापालिका व महेश काळे स्कूल ऑफ म्युझिकच्या संयुक्त विद्यमाने संगीत अकादमी चालू करण्याचा विषय सभेच्या पटलावर ठेवला होता. हा विषय दप्तरी दाखल करण्याचे महापौर उषा ढोरे यांनी जाहीर केले. त्यावर माजी महापौर मंगला कदम यांनी आक्षेप घेतला. मान्यवर कलावंताचा विषय दप्तरी दाखल करणे हा कलावंतांचा अवमान आहे. हा विषय दप्तरी दाखल करू नये, अशी मागणी कदम यांनी केली होती. या चर्चेत भाजपच्या सीमा साळवे, आशा शेंडगे यांनीही भाग घेतला.















