न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२१) :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. “मी म्हणालो होतो की परिस्थिती अशीच राहिली, तर आपल्याला लॉकडाऊन लागू करावं लागतोय की काय, अशी शक्यता होती. ती परिस्थिती आजही कायम आहे.
मधल्या काळात आपण शिथिल झालो, लग्नसमारंभ, पार्ट्या, राजकीय मोर्चे, आंदोलनं सुरू झाले. करोना गेला, अशा रितीने सगळं सुरू होतं. दुर्दैवाने जी भिती सगळे तज्ज्ञ व्यक्त करत होते, ती खरी ठरली. मार्चमध्ये गेल्या वेळेपेक्षाही आक्राळ विक्राळ रुप धारण करून करोना आलाय. हा विषाणू आपली परीक्षा बघतोय. आपल्याला धैर्याने एकत्र लढण्याची गरज आहे”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
“काही कडक निर्बंध येत्या काही दिवसांत लावावे लागतील. ते उद्या किंवा परवा जाहीर होतील. कार्यालयांना याआधीच सूचना दिल्या आहेत. काही नियम आधीच लागू आहेत. सगळ्या ट्रेन तुडुंब भरून चालल्या आहेत. रोजगार परत मिळतील, पण जीव परत मिळणार नाही”, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. “आज मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण लॉकडाऊन लागू करत नाहीये. पण दोन दिवसांत मला दृश्य स्वरूपात फरक दिसला नाही, आणि ज्यांच्याशी मी बोलतोय, त्यांच्याकडून वेगळा पर्याय दिसला नाही, तर जगात ज्या प्रमाणे लॉकडाऊनचे टप्पे जाहीर केले जातात, तसे करावे लागतील”, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.















