पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. लॉकडाऊनचे सर्व पर्याय आता निष्फळ होताना दिसून येत आहेत. कोरोनाचा दुसरा म्युटेंट घातक ठरत आहे. शहरात मृत्यूचे आकडे वेगाने वाढत आहेत. त्याकरिता प्रशासनाने वेगाने पावले उचलने आवश्यक आहे. वय वर्ष १८ ते ४४ व ४५ वर्षापुढील वयोगटासाठी कोविशील्ड व इतर लसीचे वॅक्सिनेशन जलद गतीने होणे आवश्यक आहे. मात्र, कोविड लसीअभावी शहरातील ६४ लसीकरण केंद्र बंद आहेत. लसीकरण केंद्र बंद असल्याने नागरिकांची तारांबळ व हेळसांड होत आहे. राज्य सरकारच्या लस पुरवठ्यावर विसंबून न राहता स्वतंत्र कोविड लस खरेदी करण्याची घोषणा सत्ताधाऱ्यांनी नुकतीच केली होती. तिसरी लाट उंबरठ्यावर आहे, आठवडा उलटूनही त्यावर कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. सत्ताधाऱ्यांनी ग्लोबल टेंडरिंगद्वारे नागरिकांसाठी उपलब्ध लसीचा साठा त्वरित प्राप्त करावा. त्या ६४ केंद्रांवर व खासगी रुग्णालयात देखील वेगाने लसीकरणाला सुरुवात करावी. १५ लाख लसीकरणाची केवळ नौटंकी करू नये, अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा पिंपरी चिंचवड शहर मनसे अध्यक्ष तथा गटनेता सचिन चिखले यांनी सत्ताधाऱ्यांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात चिखले यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रभाव सातत्यानं वाढत आहे. रविवारीही कोरोनामुळे ४४ जणांचा बळी गेलाय. दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण आपल्या शहरात घातकरित्या वाढत आहे. स्मशानामध्ये सुद्धा आता मृतदेह प्रतिक्षेवर आहेत. प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येत आहे. परंतु असे असूनही मृत्यू दर कमी होताना दिसून येत नाहीय. यावरचं रामबाण उपाय म्हणजे लसीकरण, तेही लसीच्या पुरवठ्याअभावी बंद झालं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. राज्य शासनाकडून मिळणारा लसीचा कोटा बिनभारोसा आहे. कधी मिळतो कधी नाही. अशातच सत्ताधाऱ्यांनी १५ लाख कोविड लस खरेदीची भीमगर्जना केली. मात्र त्यासाठी कोणतीही प्रक्रिया होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांसाठी सत्ताधाऱ्यांची भूमिका काय आहे? असा संशयही बळावतोय.
शहरात १८ वर्षाच्या पुढे १५ लाख नागरिक आहेत. प्रभाग निहाय विचार केला तर ६४ प्रभागांचे १६ भाग करून दरोरोज एका भागावर सर्व यंत्रणेने एकत्रितपणे “मायक्रो वॅक्सिंनेशन प्लॅन” पद्धतीने लसीकरण केले तर १६ भागांचे लसीकरण संपुष्टात येईल. दरोरोज चार प्रभागातील १ लाख जणांना लसीचे डोस दिले तर शहर कोरोना मुक्तीकडे पाऊल टाकताना दिसून येईल. “सिरम” सारखी जागतिक कंपनी आपल्या पुण्यात असल्याकारणाने शहरासाठी लागणारे दरोरोज चे १ लाख डोस तातडीने उपलब्ध होतील. त्यातच सिरम कंपनीने लसीचे किंमत कमी केल्या असल्याकारणाने पालिकेला कोविड डोस विकतही घेता येतील. अश्या पद्धतीने नियोजनबद्धपणे काम केले तरच कोरोना संकटातुन आपलं शहर बाहेर पडेल अन्यथा शहरातील मृत्यूचे “तांडव” रोखणे कोणालाच शक्य होणार नाही. तसेच विस्कळीत जनजीवनही पूर्वपदावर येणार नाही, याचे खापर मात्र, सत्ताधारी भाजपवर फुटेल, असे या पत्रकात चिखले यांनी म्हटले आहे.
तज्ञांनी तिसरी लाट लहान मुलांसाठी अत्यंत भयावह असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यासाठी पालिकेने बालरोग तज्ञ व याविषयीची जानकारी असणारें शास्त्रज्ञ यांच्याशी संधान बांधून यावरील उपाययोजना आमलात आणाव्यात. मान्यताप्राप्त रुग्णालयांचे डॉक्टर, पालिका प्रशासन यांनी एकत्रितपणे कोविड हटाव मोहीम व जनजागृतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. – सचिन चिखले (शहराध्यक्ष, शहर मनसे तथा गटनेता, पिं. चिं. मनपा.)….


















