न्युज पीसीएमसी नेटवर्क : पुणे : आयुक्तांनी पत्र पाठवूनही महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या मुख्यसभेत “पीएमपीएमएल’ आणि “महामेट्रो’चे अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे हे अधिकारी महापालिका आयुक्तांचे ऐकत नाहीत, अशी तक्रार नगरसेवकांनी मुख्यसभेत केली.
कोथरूड येथे मेट्रोचे काम सुरू असताना ट्रंकलाईन फुटल्याने आजूबाजूच्या सोसायट्या, रस्ते यावर ड्रेनेजचे पाणी पसरले. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली. मेट्रोच्या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार करण्याविषयीही सांगितले, मात्र काहीच कार्यवाही झाली नसल्याची तक्रार पृथ्वीराज सुतार यांनी केली. याबाबत उत्तर देण्याला “महामेट्रो’चे अधिकारी सभेत उपस्थित आहेत का? असा प्रश्नही सुतार यांनी विचारला.
त्यावर “महामेट्रो’ आणि “पीएमपीएमएल’ प्रतिनिधीला पाठवावे असे पत्र दिले होते. मात्र, अधिकारी आले नसल्याचे आताच समजले असे उत्तर आयुक्त सौरभ राव यांनी दिले. त्यावर आयुक्तांचेही ऐकत नाहीत? त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली जाते, अशी टीका सदस्यांनी केली. तसेच, “महामेट्रो’शी समन्वय साधण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक का केली नाही, असा प्रश्नही सुतार यांनी विचारला. त्यावर उद्यापर्यंत यासाठी “नोडल ऑफिसर’ची नेमणूक केली जाईल, असे आश्वासन शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी मुख्यसभेत दिले.
















