- श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सची पंतप्रधानांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून. २०२१) :- जैन समाजाविषयी अपप्रचार करणाऱ्या राजस्थानमधील अनुप मंडल या संघटनेवर बंदी घालण्यात यावी. तसेच, ही संघटना कोण चालवते ? तिला अर्थसहाय्य व राजकीय संरक्षण कोणाचे याची सीबीआय चौकशी करून तातडीने ठोस कारवाई करावी. अनुपचे सोशल मीडिया अकाऊंट बंद करावे, अशी मागणी श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
या निवेदनाची प्रत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील पाठविली आहे. तसेच, खासदार श्रीरंग बारणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना हे निवेदन दिले. त्या प्रसंगी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, सागर सांकला, पूर्व महिला अध्यक्षा रुचिरा सुराणा, कविता सेठिया, पंकज सुराणा, देवेंद्र पारख उपस्थित होते.
अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या जैन समाजाविरुद्ध अनुप मंडलच्या कारवाया सुरू आहेत. लोकांना भडकावून हिंसेला प्रवृत्त करणाऱ्या या संघटनेविरुद्ध राजस्थानात गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयानेही कारवाईचे आदेश दिले आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

















