न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ४ जाने.) :- चेन्नई स्मॅशर्स संघाने आपल्या खेळाडूंनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर अहमदाबाद स्मॅश मास्टर्स संघावर ६-(-१) असा एकहाती विजय मिळवला. या सामन्यामध्ये चेन्नई स्मॅशर्स संघाने एकही सामना गमावला नाही.
पुण्याच्या श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सुरुवातीपासूनच चेन्नई स्मॅशर्स संघाने आक्रमक खेळ करत चमक दाखवली. पुरुष एकेरीच्या सामन्यात चेन्नईच्या चोंग वेई फेंगने सौरभ वर्माला ८-१५, १५-१४, १५-९ असा विजय मिळवत आघाडी घेतली. सामन्यातील पहिला गेम सौरभने जिंकत चांगली सुरुवात केली पण, पुढच्या दोन्ही गेममध्ये फेंगने चमक दाखवत संघाला आघाडी मिळवून दिली.
यानंतर झालेल्या मिश्र दुहेरीच्या सामन्यामध्ये ख्रिस अॅडकॉक व गॅब्रिएल अॅडकॉक यांनी चमक दाखवत सात्विक साईराज रनकी रेड्डी व एन.सिकी रेड्डी जोडीला १५-१४, १५-१३ असे सरळ गेममध्ये पराभूत करत संघाची आघाडी दुप्पट केली. चुरशीच्या पुरुष एकेरीच्या सामन्यामध्ये चेन्नई स्मॅशर्सच्या राजीव औसेफने आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीचे नाव असलेल्या विक्टर अॅक्सेलसेनला १५-१२, ७-१५, १५-१३ असे चुरशीच्या लढतीत नमवित संघाची आघाडी आणखीन भक्कम केली. सामन्यातील पहिला गेम जिंकत राजीवने चांगली सुरुवात केली पण, दुस-या गेममध्ये अॅक्सेलसेनने पुनरागमन करत सामना १-१ असा बरोबरीत आणला.पण, तिस-या गेममध्ये राजीवने बाजी मारत विजय मिळवला. हा सामना अहमदाबादसाठी ट्रम्प सामना असल्याने संघाची गुणसंख्या उणे झाली.
महिला एकेरीच्या लढतीत चेन्नईच्या सुंग जी ह्युनने गिलमाऊरविरुद्ध १५-११, १५-९ असे सरळ गेममध्ये नमवित संघाची आघाडी आणखीनच भक्कम केली. शेवटच्या पुरुष दुहेरीच्या लढतीत देखील चेन्नईच्या ख्रिस अॅडकॉक व बी सुमित रेड्डी जोडीने ली चुन हेई रेगीनाल्ड व सात्विकसाईराज रनकीरेड्डी जोडीला १५-११, १५-१२ असे पराभूत केले.


















