- इंदूर शहराच्या धर्तीवर पालिकेचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात कचराकुंडीमुक्त संकल्पना राबविण्यात येणार आहे. कचराकुंडीमुक्त शहर आणि घराघरातून वेगवेगळा कचरा संकलन आदी संकल्पना पिंपरी – चिंचवड शहरात राबविण्याचा निर्णय आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. तेथील कचरासंदर्भातील संकल्पना शहरातील ४ प्रभागात प्रायोगिक तत्वावर राबविली जाणार आहे.
त्या संदर्भात घनकचरा व्यवस्थापनसंदर्भातील कामकाजाची पाहणी करण्यासाठी पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे, भाजपचे काही नगरसेवक तसेच, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी ३१ जून ते २ जुलै असा इंदूर शहराचा दौरा केला. त्यानंतर ८ जुलैला कल्याण डोंबविली शहराचा दौरा केला. आता उपायुक्त, सहायक आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक दौऱ्यावर गेले आहेत.
इंदूर शहरातील बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स या स्वयंसेवी संस्थेला प्रभाग क्रमांक ७, १५, २८ व २९ या ठिकाणी वेगवेगळा कचरा संकलनाबाबत जनजागृतीचे काम प्रायोगिक तत्वावर ३ महिन्यांसाठी दिले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक घरटी २० रूपये शुल्क दरमहा पालिका त्या संस्थेला देणार आहे. ते कामकाज कसे चालते, हे पाहण्यासाठी पालिकेचे पदाधिकारी व आता पालिकेचे १३ अधिकारी इंदूर शहराच्या दौऱ्यावर गेले आहेत. शिष्टमंडळात उपायुक्त संदीप खोत, सहायक आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, सहायक आरोग्य निरीक्षकांचा समावेश आहे.












