- अति. आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२१) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त करण्यात आले असून तेथील सर्व विकसित क्षेत्र व मालमत्ता पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. त्या संदर्भातील सर्व कामकाज करण्यासाठी पालिकेने स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्तांकडे देण्यात आली आहे.
राज्य शासनाने प्राधिकरण ७ जूनच्या अधिसूचनेनुसार विसर्जित केले. तसेच पिपरी चिंचवड महापालिकेस विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हस्तांतरणाची प्रक्रिया, सर्व चल, अचल मालमत्ता व दायित्वे, निधी व प्राधिकरणाच्या लेण्ड डिस्पाजल पॉलिसीनुसार लिज रेट, अतिरिक्त अधिमूल्य आदी सर्व शुल्कांची वसुली करणे, न्यायालयीन दाव्यांचे दायित्व, १२.५० टक्के परताव्याबाबत कार्यवाही करणे पालिकेकडे राहणार आहेत. प्राधिकरणाने विकसित करून भाड्याने दिलेले भूखंड व सुविधा भूखंड, जे अगोदरच पालिकेकडे व्यवस्थापनासाठी हस्तांतरित करण्यात आलेले आहेत, ते सर्व पालिकेकडे हस्तांतरीत होत आहेत.
याबाबतच्या कामकाजासाठी पालिकेने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तात्पुरती जबाबदारी दिली आहे. तसेच, भूमी व जिंदगी विभागाचे सहायक आयक्त हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत. प्राधिकरणातील नागरिकांची गैरसोय यामुळे दूर होणार आहे, असा दावा पालिकेने केला आहे.













