- राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत पीसीईटीची उल्लेखनिय कामगीरी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ फेब्रु.) :- महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संशोधन व निरीक्षण वृत्ती जोपासली जावे म्हणून सर्व विद्यापीठाची एकत्रित ‘राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धा’ घेण्यात येते. या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांची ‘राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धा २०१८ ’ ही स्पर्धा गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात जानेवारी महिन्यात संपन्न झाली.
या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी लक्षणीय कामगीरी केले. शिक्षक गटामध्ये प्रा. संजय साळवे यांनी ‘ॲग्रीकल्चर ॲण्ड ॲनिमल हसबंडरी’ विभागात प्रथम क्रमांकात आणि प्रा. अजय गायकवाड यांनी ‘इजिनिअरींग टॅक्नोलॉजी विभागात प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेत राज्यातून एकूण वीस विद्यापीठातून ५८० संघांनी सहभाग घेतला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ४८ स्पर्धकांमध्ये पीसीईटीच्या प्रा. संजय साळवे, प्रा. अजय गायकवाड, प्रा. पल्लवी धाडे, प्रा. वर्षा हरपळे, प्रा. तन्मय खांबेकर आणि तेजस ओक, गौरव शेटे यांची निवड करण्यात आली होती.
प्रा. संजय साळवे यांना शिक्षक गटात ॲग्रीकल्चर ॲण्ड ॲनिमल हसबंडरीमध्ये ‘A low cost solar dryer made from waste alluminium cans for drying agriculture products’ ह्या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला. ह्या यंत्रात शेतातील भाजीपाला व फळे विटामीन, रंग, गुणवत्ता हे सर्व अबाधीत ठेवून उत्तमरित्या वाळवून ठेवता येतात. याचा शेतक-यांना फळे, भाजीपाला टिकवून ठेवण्यासाठी उपयोग होतो. बाजारभाव चांगला मिळाल्यानंतर फळे, भाजीपाला विक्री करुन शेतक-यांना फायदा होतो. प्रा. अजय गायकवाड यांना शिक्षक गटात इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलॉजी विभागात प्रथम क्रमांक मिळाला. त्यांनी ‘डिसपॅचींग शेड्युल ऑप्टीमाझर फॉर आरएमसी ट्रक्स् ’ हा प्रकल्प सादर केला. यामध्ये कमी ट्रक्स् वापरुन कमीत कमी वेळेत उत्पादीत माल कमी वेळेत दुसरीकडे पोहचविण्याचा अल्गोरीद्म तयार केला होता. प्रकल्पासाठी प्रा. डॉ. ए. एम. फुलंबरकर यांनी मार्गदर्शन केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. ए.एम.फुलंबरकर यांनी यशस्वी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.











