- कालावधीची अटही शिथिल; अनं अनुदानातही वाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाअंतर्गत विविध कल्याणकरी योजना राबविल्या जातात. त्यात महिलांना उद्योग व्यवसाय करता यावा, यासाठी बचतगटांना अनुदान देण्यात येते. यापुर्वी दोन वर्ष झाल्यावर २० हजार रुपये व १० वर्षे झाल्यावर २५ हजार रुपयाचे अनुदान मिळत होते. मात्र, व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरवातीच्या काळात आर्थिक मदतीची गरज असते. हे ओळखून योजनेत बदल करण्यात आला आहे.
बचतगटांना प्रोत्साहन मिळावे व उद्योग सुरू करता यावा यासाठी बचतगटाची स्थापनेनंतर सहा महिने पूर्ण झाल्यावर १५ हजार रुपये व २ वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा १५ हजार रुपये असे दोन वर्षांत ३० हजार रुपये मानधान मिळणार आहे. महिलांनी बचतगटांची स्थापना करून उद्योग सुरू करावेत, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी सन २००० मध्ये ही योजना सुरू केली. गेल्या २२ वर्षांत समाज विकास विभागाकडे १८६५७ बचत गटांची नोंद आहे.
समाज विकास अधिकारी सुहास बहादरपुरे म्हणाले की, बचतगटांना दोन वेळाच अनुदान मिळते. पूर्वी बचतगटाची स्थापना झाल्यानंतर २ वर्षांनी व स्थानंतर १० वर्षे पूर्ण ‘ झाल्यावर अनुदान मिळत होते. मात्र, आर्थिक अडचणींअभावी बचतगटांना व्यवसाय बंद करण्याची वेळ येते. तसेच १० वर्ष बचतगट अनेकदा रहात नाहीत. सुरवातीला आर्थिक गरज भासते. त्यामुळे अनुदान योजनेत बदल केला आहे.