न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२२) :- दहशतवादी विरोधी पथकाने लष्कर ए तोयबाच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला दापोडीतून अटक केली आहे. या कारवाईत अटक केलेल्या तरुणाचे नाव मोहम्मद जुनेद आहे. तो एका मदरशाजवळ राहत होता. लष्कर ए तोयबाच्या जम्मू येथील आफताब शहा आणि उमर या दोघांच्या संपर्कात तो होता. या दोघांकडून त्याच्या बँक खात्यावर अतिरेकी कारवायांसाठी पैसे जमा झाले होते.
अतिरेकी संघटनेसाठी तरुण मुलांची भरती करणे आणि दारूगोळा आणि शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी त्याला फंडिंग केली जात होती. दापोडी परिसरातील काही स्थानिक तरुणांच्या संपर्कातही जुनेद होता. स्थानिक तरुणांना अतिरेकी कारवायात सहभागी करून घेण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. त्याच्या संपर्कात असलेल्या काही तरुणांनी देश सोडला असल्याचीही माहिती समोर येत आहे.
काल दुपारपासून त्याची चौकशी सुरू होती. त्यानंतर जुनेद चौकशीत दोषी आढळल्याने रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनेद हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवाशी आहे. हा मागील दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. जुनेदचे शिक्षण मदरशात झालं आहे.