न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जून २०२२) :- गोवा राज्य निर्मित व केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेल्या विदेशी मद्याचा ५९ लाख ६० हजार ४०० रुपये किमतीचा साठा ट्रक कंटेनरमध्ये मिळून आला. विदेशी मद्याचे एकूण १००६ बॉक्स मिळुन आले. दारू तसेच वाहन असा एकूण ८७ लाख ६० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी हे मद्यसाठा घेऊन जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार, मुबंई-बंगळूर महामार्गावर सोमाटणे फाटा बाह्यवळण व तळेगाव टोलनाका या परिसरात सापळा लावण्यात आला. संशयावरून दोन ट्रक कंटेनरची तपासणी करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोमाटणे फाटा व तळेगाव टोल नाका येथे रविवारी (दि. ५) ही कारवाई केली.
जयकिसन धीमाराम ढाका आणि सुजानाराम जियाराम बिष्णोई (दोघे रा. बाडमेर, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पिंपरी-चिंचवडचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी माहिती दिली.
















