- दिव्यांगासाठी नव्या योजना, धोरण ठरविण्यात येणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जून २०२२) :- महापालिकेकडून सध्या शहरातील दिव्यांगांचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणातंर्गत क्षेत्रीय कार्यालयनिहाय दिव्यांगाची २२ दिवसांत १८०० नोंद झाली आहे. या सर्वेक्षणामुळे शहरातील दिव्यांगांचा नेमका आकडा कळणार आहे. तसेच त्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्यासाठी आवश्यक योजना निर्माण करणे शक्य होणार आहे.
४० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींना महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ मिळतो. महापालिकेकडून शहरातील दिव्यांग नागरिकांच्या सर्वेक्षणाला १० मे पासून सुरुवात झाली. यापुढे देखील हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन पद्धतीद्वारे हे सर्वेक्षण केले जात आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळावर ‘ सारथी दिव्यांग किरण ‘ ही एक स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या दिव्यांगांना ऑनलाइन अर्ज भरणे शक्य नाही त्यांनी नजीकच्या क्षेत्रीय कार्यालयात जाऊन वैयक्तिक माहिती द्यायची आहे.
दिव्यांग नागरिकांनी सर्वेक्षणात लवकरात लवकर सहभाग घेऊन त्यांची वैयक्तिक माहिती द्यावी. जेणेकरून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्यासाठी नव्या योजना निर्माण करणे किंवा धोरण ठरविणे सोयीचे होणार आहे.
– श्रीनिवास दांगट, सहायक आयुक्त, समाज विकास विभाग, महापालिका…
















