- ताथवडेतील घटना; पोलिसांकडून पत्नीवर गुन्हा दाखल…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२२) :- घरगुती भांडणाच्या कारणावरून सोमवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान पत्नीने पतीच्या डोक्यात मारून त्यांचा खून केला. खून केल्यानंतर आरोपीने मयताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला.
मात्र हा बनाव नंतर उघडकीस आला. हा प्रकार सोमवारी (दि. ६) मध्यरात्री दोन वाजता ताथवडे येथे घडला. मयत पती आणि त्यांची पत्नी ताथवडे येथील लोंढे वस्तीत खोलीत भाड्याने राहत होते.
अनिल उत्तमराव राठोड (वय ३५) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. मयताचा भाऊ रविकुमार उत्तमराव राठोड (वय ३२, रा. परभणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ७) फिर्याद दिली आहे. अनिल यांची पत्नी उषा अनिल राठोड हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.


















