- कंपनीच्या पुनरूज्जीवनासाठी उपाययोजनाचे आश्वासन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२२) :- पिंपरीतील हिंदुस्थान ॲन्टिबायोटिक्स कंपनीला (एचए) भेडसाविणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कंपनीच्या पुनरूज्जीवनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय स्थायी समितीने दिले.
केंद्रीय स्थायी समितीच्या अंतर्गत रसायने आणि खते संसदीय समितीच्या सदस्यांनी हिंदुस्थान ॲन्टिबायोटीक्स कंपनीला भेट दिली. कंपनीला भेडसाविणाऱ्या अडचणी समिती सदस्यांनी जाणून घेतल्या. समितीच्या अध्यक्ष कनिमोझी करूणानिधी, खासदार दीपक बैज, प्रतापराव पाटील चिखलीकर, कृपालनाथ मल्ला, प्रभुभाई वसावा, सत्यदेव पचौरी, अरूण कुमार सागर, अयोध्या रामी लेड्डी अल्ला, जयप्रकाश निषाद, विजयपालसिंह तोमर यांच्याबरोबरच आर्थिक सल्लागार एच. के. हाजोंग, फार्मास्युटिकल्स विभाग आणि लोकसभा सचिवालयातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संसदीय समितीने पिंपरी येथील हिंदुस्थान ॲन्टिबायोटिक्सच्या कारखान्याला भेट दिली. उपलब्ध उत्पादन सुविधा, उत्पादनांची माहिती तसेच कंपनीच्या भविष्यकालीन योजनांची माहिती समिती सदस्यांनी घेतली. भविष्यातील योजनांबाबतचे सादरीकरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केले. कंपनीला येणाऱ्या अडचणींचा सकारात्मक विचार संसदीय समिती करेल आणि कंपनीच्या पुनरूज्जीवनासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रस्तावित केल्या जातील, असे आश्वासन समितीकडून देण्यात आले.
हिंदुस्थान ॲन्टीबायोटिक्स ही कंपनी केंद्र सरकारची अंगीकृत कंपनी आहे. पेनिसिलीनचे उत्पादन कंपनीकडून प्रामुख्याने केले जाते. गेल्या काही वर्षांपासून ही कंपनी आर्थिक डबघाईला आली आहे. कंपनी कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतनाबरोबरच अन्य देणी देण्यासाठी कंपनीकडे पैसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे कंपनीची जागा विकून पैसे उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.