- महापालिका निवडणूक आयोगाकडे मुदतवाढीची करणार मागणी?…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जुलै २०२२) :- महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर हरकतींचा अक्षरश: पाऊस पडला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीत रविवार (दि. ३) अखेर तब्बल ८ हजार १४७ हरकतीं नोंदविण्यात आल्या आहेत. व्यक्तिगत दिलेल्या सर्व हरकती पाहता दीड लाखाहून अधिक मतदाराच्या नावांबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत.
प्रारूप मतदार याद्यांवर सुरुवातीला ३० जूनपर्यंत हरकती घेण्यास मुदत होती. मात्र, मुदतवाढीची मागणी झाल्यानंतर ३ जुलैपर्यंत मुदत वाढवून दिली. इच्छुक व माजी नगरसेवकांनी केलेल्या हरकतींमध्ये सुमारे दीड लाखाहून अधिक मतदारांच्या नावांबाबत आक्षेप आहे. तर काही मतदाराचे नाव घेण्यात आले नाही.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५ लाख ८६ हजार ८४९ मतदार आहेत तर. भोसरी विधानसभा मतदारसंघात ५ लाख २७ हजार ७९९, पिंपरी विधानसभेत ३ लाख ७६ हजार ४७० आणि भोर विधानसभा मतदारसंघातील ताथवडे गावात ९ हजार ५७५ मतदार आहेत.
महापालिका निवडणूक विभागाकडे मोठ्या प्रमाणात हरकती प्राप्त झाल्या आहेत. ९ जुलैला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. मात्र, हरकतींची संख्या पाहता ते शक्य नाही. हरकतींवर निवडणूक विभागाचे कर्मचारी समक्ष जावून हरकतींमध्ये तथ्य आहे का? याची पाहणी करणार आहेत. त्यासाठी सुमारे दहा दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याने आयोगाकडे अंतिम मतदार याद्या प्रसिद्धीसाठी मुदतवाढ मागितली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्राप्त हरकतींची शहानिशा करून पुढील कार्यवाहीसाठी महापालिकेने कामकाज सुरु केले आहे. यासाठी २३५ प्रगणक, ४८ सुपरवायझर, ८ क्षेत्रीय अधिकारी आणि महापलिका मुख्यालयात १६ असे एकूण ३०७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हरकतींवर कार्यवाही करून सदोष मतदार याद्या प्रसिद्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.