- नागरिकांच्या गैरसोयी दूर; कामाला मिळणार गती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२२) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विसर्जित झाले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विकास प्राधिकरण विलीन केल्याची अधिसूचना ७ जुलै २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
प्राधिकरण बरखास्त झाल्याने त्यांची मालमत्ता, निधी, देय रकमा ‘ पीएमआरडीए ‘ कडे सुपूर्द करण्यात आल्या. भाडेपट्ट्याने दिलेले भूखंड, सार्वजनिक सुविधांसाठीचे भूखंड, अतिक्रमण झालेल्या भूखंडाचा ताबा पिंपरी – चिंचवड महापालिकेकडे देण्यात आला. पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रासाठी पिंपरी – चिंचवड महापालिका विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहत आहे,
बांधकाम परवानगी, टीडीआर, एफएसआय मंजुरीचे अधिकार महापालिकेला मिळाले आहेत. सहा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. या कामासाठी महापालिकेने विशेष प्राधिकरणाचा भूमी-जिंदगी विभाग ऑक्टोबरमध्ये सुरू केला. सेक्टर नंबर १८ चिखली जाधववाडी बालघरे वस्ती येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले. मात्र हे कार्यालय शहरवासीयांना येण्या जाण्यासाठी गैरसोयीचे ठरत होते. दरम्यान पिंपरी – चिंचवड महापालिकेने विशेष प्राधिकरणाचे कार्यालय खराळवाडी, पिंपरी येथील केएसबी पंपासमोर पुणे – मुंबई महामार्गावर सुरू केले आहे. त्यामुळे अभिलेख हस्तांतराबरोबर नागरिकांची अनेक कामे मार्गी लागणार आहेत.
बालघरेवस्ती, चिखली येथे महापालिकेने विशेष नियोजन प्राधिकरण कार्यालय चालू केले होते; मात्र ते नागरिकांना येण्या-जाण्यासाठी गैरसोयीचे होते. तक्रारीही होत्या. दरम्यानच्या काळात विकसकांकडून पालिकेस जागा मिळाली. त्यामुळे खराळवाडी पिंपरी येथे आता महापालिकेने विशेष प्राधिकरण कार्यालय सुरू केले आहे. हे कार्यालय पुणे – मुंबई महामार्गालगत असल्याने नागरिकांची गैरसोयी दूर होईल. त्याबरोबरच अभिलेख हस्तांतराचे काम वेगाने मार्गी लागेल. – मुकेश कोळप, प्रशासन अधिकारी…