- साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह पालिकेचे नवे कारभारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची मंगळवारी तडकाफडकी बदली झाली आहे. त्यांच्या जागी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची आयुक्तपदी बदली झाली आहे. पूर्वी ते गडचिरोली येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. शेखर सिंह हे २०१६ च्या बॅचचे अधिकारी असून देश पातळीवर त्यांनी ३०६ वा क्रमांक पटकावला होता.
ओडिशा केडरचे २००५ च्या बॅचचे आयएएस राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी १५ फेब्रुवारी २०२१ रोजी नियुक्ती झाली होती. ते प्रतिनियुक्तीने ५ वर्षासाठी महाराष्ट्रात आले होते. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात पिंपरी चिंचवड शहरात पाटील यांची नियुक्ती झाली होती.
महापालिकेत दाखल झाल्यानंतर आयुक्त पाटील यांनी प्रशासकीय शिस्त लावली, तसेच प्रशासकीय गतिमानता आणि स्वच्छ भारत अभियानात खूप चांगले काम केले आहे. महापालिकेच्या प्रशासकीय कालखंडात त्यांनी जनसंवाद उपक्रमातून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फाडली होती.












