न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२२) :- पुणे – नाशिक महामार्गावरून मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक ४,६,९ कडे ये-जा करण्यासाठी एक किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. हा वळसा वाचविण्यासाठी या ठिकाणी वळण रस्ता तयार करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने प्राधिकरणातील पेठ क्रमांक ४, ६,९ तसेच चिखली प्राधिकारणातील पेठ क्रमांक १३, १४, १५, १६ या पेठांचा विकास करण्यात आला आहे. त्यामुळे या पेठांमध्ये सध्या हजारो नागरिक राहतात. पुणे – नाशिक महामार्गावरून मोशीकडून एक किलोमीटर अंतरावरील स्पाइन रस्त्याशिवाय जवळचा कोणताही मार्ग नाही. त्यामुळे कचरा डेपो सिग्नल ते मोशी – चिखली प्राधिकरण या ठिकाणी येण्यासाठी चालक धोका पत्करून महामार्गाने विरुद्ध दिशेने प्रवास करतात.
येथील पेठ क्रमांक सहामध्ये पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे. या ठिकाणी अनेक वाहनचालक येण्यासाठी याच विरुद्ध दिशेने येण्याचा मार्ग पत्करतात. स्पाईन रोड चौकातून येण्यासाठी जवळजवळ एक किलोमीटर वळसा घालून यावे लागते. त्यामुळे या पेठांकडे येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून पुणे नाशिक महामार्गावरील तापकीरनगर समोरील वळण मार्ग तयार करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.